मुंबई - ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, समालोचक तसेच मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर संत (वय 61) यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मुलुंड येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुजाता, तसेच प्रसन्न आणि चैतन्य ही दोन मुले आहेत. त्यांच्या निधनाने क्रीडा पत्रकारितेतील संतच हरपला, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
संत यांच्या निधनामुळे देशी खेळांच्या प्रचार-प्रसारासाठी झटणारा एक पत्रकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. क्रीडा पत्रकारितेत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणारे संत हे सुरवातीला अभ्युदय बॅंकेत नोकरीला होते. 1978च्या सुमारास ते "महाराष्ट्र टाइम्स‘मध्ये रुजू झाले. तब्बल 25 वर्षे ते "मटा‘त क्रीडा पत्रकार म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर "स्पोर्टस वीक‘मध्येही त्यांनी काम केले होते. आकाशवाणी व दूरदर्शनवरील सर्व प्रकारच्या खेळांच्या समालोचनामुळे ते महाराष्ट्राला परिचित होते. क्रिकेट हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा सर्वच स्तरांवरील क्रिकेटवर त्यांनी विपुल लेखन केले. क्रिकेटकडे ओढा असला, तरी पत्रकार म्हणून देशी खेळांकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष केले नाही. ते सतत फिरत असायचे. क्रीडा संघटनांचे पदाधिकारी असोत वा खेळाडू, संत हे प्रत्येकाच्या संपर्कात असायचे. एका अर्थाने ते मैदानावरचेच पत्रकार होते. देशी खेळांच्या प्रचारासाठी झटणारा एक चळवळ्या; तसेच क्रीडा क्षेत्रातील जाणकार पत्रकार हरपला, अशा शब्दात क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी संत यांना श्रद्धांजली वाहिली. कबड्डीच्या प्रचार-प्रसारासाठी कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांनी काढलेल्या जपान दौऱ्यातही ते सहभागी झाले होते. ज्येष्ठ आणि कनिष्ठ पत्रकार असा भेदभाव त्यांनी कधीही केला नाही. प्रत्येकाशी ते पटकन जुळवून घ्यायचे. त्यांच्या याच गुणांमुळे खेळाच्या अनेक संघटनांमध्ये विविध पदे भूषविण्याची संधीही त्यांना मिळाली. या जबाबदाऱ्याही त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या. ते मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांच्यावर आज संध्याकाळी विक्रोळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. |
Friday, 14 November 2014
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment